Thursday, 16 February 2017

'शिवसेनेचा व्हिजनऐवजी टक्केवारीत इंट्रेस्ट'

विकासाचा अजेंडा राबवण्याचे काम नागपूर महापालिकेने केले. पण, महापौर आणि स्थायी समिती असूनही मुंबई महापालिकेत पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापनाबाबत काहीही घडलेले नाही. शिवसेनेला व्हिजन या गोष्टीशी काहीही देणेघेणे नसून त्यांना केवळ टक्केवारी हवी आहे. या टक्केवारीनेच मुंबईचा घात केल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी विलेपार्ले येथील सभेत केला. शिवसेनेस लक्ष्य करताना दर्जेदार रस्ते आणि विकासाची कामे झाली की अधिकारी, नगरसेवक आणि नेते नाराज होत असल्याचा गौप्यस्फोट करत गेल्या २० वर्षांत सेनेने अशी कोणती कामे केली की मुंबईकरांना ती आपलीशी वाटेल, असाही टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेने प्रादेशिक पक्षांबरोबर युती करू असे जाहीर केले आहे, त्याचाही समाचार गडकरी यांनी या सभेत घेतला. तुम्ही मायावती, मुलायमसिंह, ममता बॅनर्जी यांच्या बरोबर जाणार का आणि ते तुम्हाला घेतील का, असा मुद्दा त्यांनी मांडला. युती ही दोन पक्षांची मजबुरी असून दोघांनाही एकमेकांची गरज असते. आमची युती नसती तर तुमचा मुख्यमंत्री झाला असता का, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांत काहीही तथ्य नसून मी दिलेल्या त्रासाच्या रागापोटी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी नागपूर महापालिकेची चौकशी लावली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यांनी गुंतवले. पण, देवेंद्र फडणवीस क्लीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment